Easy Home Remedies For Glowing Skin

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेणं गरजेचं; होतात ‘हे’ फायदे

-डॉ. रिंकी कपूर

सतत वातावरणात होणारे बदल, बदललेली जीवनशैली, झोपेच्या अनियमित वेळा यामुळे आपल्या शरीरावर आणि थेट त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे अनेक जण चेहरा फ्रेश दिसावा, सुंदर दिसावा यासाठी महागडे सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत असतात. तर काही जण घरगुती उपायदेखील करतात. परंतु, जर रोजच्या धावपळीत त्वचेची काळजी घेणं शक्य नसेल तर, अशा स्त्रियांनी, तरुणींनी निदान रात्री झोपण्यापूर्वी तरी त्वचेची काळजी घ्यावी. विशेष म्हणजे अनेक वेळा रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेतल्यास त्याचा फायदा जास्त होत असल्याचं पाहायला मिळतं.

१. दिवसाच्या तुलनेत रात्री त्वचेचा पोत सुधारण्याचं काम होत असतं. कारण झोपेत आपल्या त्वचेलाही विश्रांती मिळते. यासाठी झोपताना मॉईश्चरायझर, नाईट क्रिम, रिप्लेनिशिंग क्रीम, सेरम यांचा वापर करता येतो. दररोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ करूनच झोपावे.

२.प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची नाईट क्रिम लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही प्रोडक्ट आपल्या मनाने वापरु नये.

३. रात्री झोपताना वापरण्याची सर्व उत्पादने तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असतात. त्वचा तेलकट किंवा अक्रे असलेली असेल तर ज्या क्रीममध्ये जास्त पाणी असेल अशी क्रीम वापरा. मात्र ते वारंवार वापरायचे की नाही यासाठी वैद्यांचा सल्ला घ्या, कारण याच्या अतिवापरामुळे मुरमेही येऊ शकतात.

४. दिवसभरात धूळ, माती, प्रदूषण, मेकअप, सौंदर्यप्रसाधने यांचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे त्वचेवर असलेली रंध्रे झाकली जातात. त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. त्यानंतर नैसर्गिक क्लिजिंग, टोनिंग आणि मॉश्चराइजर वापरावे.

५. त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी त्वचेवर सीरम लावणे गरजेचे आहे. तुम्हाला हवे असल्यास अँटी एजिंग सिरमचाही वापर करू शकता. त्वचा तेलकट असल्यास तुम्ही सॅलिसिलिक अ‍ॅसिड आणि रेटिनॉल फेस सिरम लावा. घरगुती सिरम म्हणून कोरफडीचा रस काढून एका बाटलीमध्ये साठवून ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा. पण ताज्या रसाचा वापर नेहमी करावा.

६. रात्री झोपण्याआधी त्वचेला मॉश्चराइजरच्या मदतीने मॉश्चराइज करणे फार चांगली सवय आहे. यामुळे त्वचेवरील डेड स्कीन तर निघेलच सोबतच त्वचेला पोषण देखील मिळेल.

७. दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी त्वचा सक्रीय घटक अधिक प्रमाणात शोषून घेते. तसंच रात्री झोपेत त्वचेच्या पेशीनिर्मितीचा वेग अधिक असतो. त्यामुळे नाईट क्रीमच्या माध्यमातून त्वचेचे पोषण करण्यासाठी हीच योग्य वेळ असते.

८. रात्री रक्ताभिसरण अधिक वेगात होते आणि स्कीन केअर उत्पादनांमधील पोषक घटकांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. नाईट क्रीम लावल्यामुळे सकाळी तुमच्या त्वचेला ताजेपणा व उजळपणा प्राप्त होतो.

Article Source – https://www.loksatta.com/lifestyle-news/easy-home-remedies-for-glowing-skin-ssj-93-2212857/